अबोल प्रेम...

तो तिला पाहायचा… जणू गर्दीतल्या प्रत्येक आवाजामागे तिचंच नाव ऐकू येतंय असं. जणू वेळ थांबली की त्याच्या नजरा फक्त तिच्यापाशी येऊन विसावतात. शब्द त्याच्याकडे कमी होते, पण नजरेत एक शांत, खोल कविता होती.


गर्दीत, कॉरिडॉरमध्ये, लायब्ररीच्या शांत कोपऱ्यात… तो काही बोलायचा नाही. फक्त बघायचा. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं... ना उघडपणे प्रेम, ना ओळखीची धाडस… फक्त एक मृदू, शांत स्थिरता.


ती मात्र कधीच लक्ष देत नव्हती. तिच्या जगात शब्द होते, लोक होते, हशा होता… आणि तो? तो फक्त एक नजरेत हरवलेला चेहरा.


एक दिवस योगायोगाने ते बोलले. सुरुवात साधीच होती... नोट्स, कॉफी, एक हलकीशी स्मितरेषा… आणि मग वेळच थांबली. पहिल्यांदाच ते समोरासमोर बसले होते. ती बोलत होती… आणि बोलतच होती. तिच्या गोष्टी, तिचे विचार, तिचे छोटे छोटे निरीक्षणं. ती जणू एखाद्या ओघवत्या नदीसारखी वाहत होती. आणि तो?

तो फक्त ऐकत होता.


तीन तासांत त्याने कदाचित तीस मिनिटंही बोललं नसेल. पण त्याच्या चेहऱ्यावर एक शांत आनंद होता, जणू तिच्या प्रत्येक शब्दाला तो जपून ठेवत होता.

कॉफी मात्र थंड झाली होती. तो हलकंसं हसला.

“अगं, कॉफी पण आहे इथे… थोडं तिच्याशी पण बोल ना. नाहीतर ती पण माझ्यासारखी फक्त तुला ऐकत बसेल.”

ती हसली.

“मग तूच घे संधी… मी थांबते आता. बोल.”

तिने कप हातात घेतला. एक घोट घेतला.

आणि वर पाहिलं. तो आधीपासूनच तिच्याकडे पाहत होता. ती थोडी थांबली. त्या नजरेत काहीतरी होतं...ना घाई, ना लपवाछपवी… फक्त एक कोमल, निसटतं प्रेम.

“काय बघतोयस?” ती हसत विचारते.

तो काही बोलला नाही.

फक्त हलकंसं स्मित केलं… आणि शांतपणे कॉफीचा घोट घेतला.


त्या क्षणी तिला पहिल्यांदा जाणवलं.

काही लोक शब्दांनी नाही, तर नजरेने प्रेम करतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look

The weight of a DECISION