गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज
मुंबईची लोकल म्हणजे फक्त प्रवास नाही, ती एक भावना आहे - गडबड, घाई, आणि तरीही प्रत्येकाच्या आयुष्यातील एखादी छोटीशी कथा जपणारी.
तो दिवसही तसाच होता.
ऑफिसमधून उशीर झालेला गौरव स्टेशनवर लोकल पकडायला अक्षरशः धावत होता. जिना उतरतानाही त्याच्या पावलांना ब्रेक नव्हता. लोकल सुटत होती, पण त्याला ती कोणत्याही परिस्थितीत पकडायची होती. त्याच वेळी, एक मुलगी मात्र शांतपणे, पुढच्या लोकलच्या वेळेनुसार चालत होती. तिच्या चेहऱ्यावर घाई नव्हती, तर एक शांत लय होती.
आणि अचानक…
धडाम!
गौरवचा जोरदार धक्का लागून ती मुलगी खाली पडली.
गौरव मात्र इतका घाईत होता की त्याला याचं भानही नव्हतं. तो पुढे पळतच राहिला. मुलगी उठली, रागाने ओरडली. आजूबाजूचे लोकही त्याला सुनावत होते. पण तो? तो तर त्या सगळ्यापासून अनभिज्ञच.
लोकलमध्ये चढून सीटवर बसताच त्याने एक मोठा श्वास घेतला - “हुश्श!”
तेवढ्यात एक माणूस शेजारी येऊन बसला आणि त्या माणसाने विचारलं,
“अरे एवढी कसली घाई? तुझ्या धक्क्याने एक मुलगी पडली, आणि तू मागे वळून बघितलंही नाहीस, सॉरीही नाही म्हणालास.”
गौरव थोडा गोंधळला.
“हो का? गडबडीत झालं असेल. फार लागलं नसेल ना?”
“माहित नाही, पण कपडे फाटलेले वाटले.”
“बरं बरं…”
इतकंच म्हणत तो शांत झाला.
ऑफिसच्या थकव्याने त्याला कधी झोप लागली, त्यालाही कळलं नाही. डोळे उघडले तेव्हा…
“CSMT!”
तो चकित झाला.
“अरे देवा! मुलुंडला उतरायचं होतं, आणि इथे आलो! आता उशीर होणार… डॉक्युमेंट पाठवायचं होतं… काय यार गौरव, तू पण ना!”
तो स्वतःलाच बोल सुनावत होता. तेवढ्यात एक हलका, नाजूक आवाज आला -
“गौरव!”
त्याने वैतागून मागे पाहिलं. एक ५’२” उंचीची मुलगी, मान वरकरून त्याच्याकडे पाहत होती.
“गौरव सूर्यवंशी ना?”
“हो… पण तुम्ही कोण?” तो गोंधळला.
ती हसली -
“अरे, मला नाही ओळखलंस?”
गौरवने कटाक्ष टाकत म्हटलं -
“तुम्ही काय माधुरी दीक्षित आहात का, लगेच ओळखायला?”
ती हसत त्याच्या दंडावर हलकासा मारत म्हणाली -
“अजूनही भंकस करायची सवय गेली नाही वाटत तुझी… गुश्या!”
“गुश्या?”
तो थबकला.
“अरे नेण्या तू!”
“नेण्या नाही… अरण्या नेने!”
त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"नाही नाही नेण्या! अगं आज इतक्या वर्षांनी, मला वाटतं कॉलेज नंतर आज 8 वर्षांनी बघतोय...
क्षणभर दोघेही शांत झाले. गौरवने तिच्याकडे पाहिलं-
“तू इथे कशी? आणि हा काय अवतार?”
ती थोडी नाराज होत म्हणाली-
“काय सांगू… एका दळभद्री मुलाचा लोकलमध्ये चढताना धक्का लागला… त्यामुळे हे सगळं झालं. तुझ्यासारखाच दिसत होता तो! आणि मी राहायला इथेच आहे.”
गौरव थोडा हसला…
“तो दळभद्री मुलगा मीच आहे. माझाच धक्का लागला…”
क्षणभर शांतता…
“बहुतेक देवाने मला तुला ‘सॉरी’ म्हणायला इथे आणलं असावं.”
ती हलकंसं हसली -
“हो का... मला तरी वाटत तुझे तुटलेले जुने धागे जोडायच्या प्रयत्न पण असू शकतो...… बरं, चहा? little little?”
दोघेही हसत हसत स्टेशनबाहेरच्या चहाच्या टपरीकडे निघाले…
कधी कधी आयुष्य आपल्याला धक्का देतं - शब्दशः.
पण तोच धक्का, एखादी हरवलेली ओळख पुन्हा समोर आणतो.
आणि मग कळतं…
की प्रत्येक धावपळीत, कुठेतरी एक भेट आपली वाट पाहत असते. ☕
Maan khush zala g❤️
ReplyDeleteThank you 😊😊
Delete