प्रेमाची गोष्ट: उषा शिशिर

मी आणि आजी आज घरातल्या साफसफाई मोहिमेला लागलो होतो. झाडू, तोंडा - डोक्यावर स्कार्फ, आणि रेडिओ वरील गाणी. आजीने स्टूल लावून दिले आणि ती मस्ती मध्ये म्हणाली, "चल मेरे झमुरें तयार हो जा अपनी कला दिखाने" मी तिचं लाडकं माकड पटकन् उडी मारून तयार. झाडू मारून धूळ पहिले साफ केले. ते करत असताना एक खोक दिसलं. ते थोडं मागे म्हणून सारायला गेले आणि थोडासा जात असलेला तोल सांभाळताना टुणूक्कण त्यातला एक फोटो अल्बम माझ्या डोक्यात पडला. मी आपलं सहज कुतुहल म्हणून बघावं म्हटलं तर तो आजी आणि आजोबांच्या लग्नाचा अल्बम होता. मी खूप हट्ट करून आजीला सांगून ते खोक खाली उतरवले.

साफसफाईची मोहीम बाजूला सारून आम्ही आठवणीच्या मोहिमेला छेडायचे असे ठरवले. एक एक करून मी त्या खोक्यातून आबांच्या (आजोबांच्या) गोष्टी काढून बाजूला ठेवत होते. आजी मात्र एक एक गोष्टीवरून धूळ हाताने बाजूला सारत होती. "अगं आदू (लाडाने आजी) हे काय करतेस, फडक्याने धूळ पूस हाताने कुठे करतेस, खराब होतील ना!" आजी खुदकन हसून म्हणाली "असुदेत अगं. माणसाच्या आठवणींना पण काही दिवसांनी अशीच धूळ लागते. त्याच्या गोष्टी अडगळ म्हणून कुठे तरी दूर सारल्या जातात." आम्ही अल्बम बघत होतो, तेच माझी छोटी चुलत बहिण जानकी शाळेतून आली. येतेबरोबर आदू करत आजीला मिठी मारली आणि मांडीत येऊन बसली. "अय्या ही कोण आदू? किती सुंदर आहे ही बाई... पण हे फोटो ब्लॅक अँड व्हाइट का आहेत? फोटो जुने झाले की त्यातले रंग निघून जातात का? आणि जातात तर कुठे जातात?" तिच्या निरागस प्रश्नावर मी आणि आदू हसलो. ती मात्र प्रश्नात्कक चेहऱ्याने आळीपाळीने आमचे चेहरे बघत होती. आदू लाडाने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिचे पप्पी घेऊन म्हणाली, "हे. नाही गं माझी छबुडी असे काही नाही. हे फोटो जेव्हा घेतले तेव्हा रंगीत फोटो नव्हते त्यामुळे असेच कृष्ण धवल फोटो यायचे." "कृष्ण धवल काय असते बुवा? कोणी मोठे फोटोग्राफर आहेत का की मोठा ब्रँड?" तिचे प्रश्न ऐकून माझा जो हश्या सुटला बापरे... मी पटकन् तिच्या डोक्यात टपली मारून "बावळट, कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट" असे बोलले. तेच तिने चेहरा छोटा करून माझ्या कडे काहीसे रागाने पाहिले. मी पण तिचे नक्कल करत तिच्या सारखा चेहरा केला. आदूने हळूच मला चापटी देत, "जननी नाही, परत असं बोलायचं नाही" म्हणून खडसावले. मी पण "नाही करणार " असं बोलले.

"बरं पुढे बघुयात का आता?" आजी हे म्हणुस्तोवर जानकीने खोक्यातल्या गोष्टी उलट्या करायला सुरू केले, तोच तिला काही कागदांचा छोटा गठ्ठा दिसला. ती कुतुहलाने, "हे काय आहे?" तोच आजीने काहीस लाजत तो तिच्या हातातून घेतला, "बरं तुला काय भूक लागली आहे असं दिसत नाही आहे?" "लागली आहे ना, भरपूर... मी कांता मावशींना लाडू द्यायला सांगू?" आदूने होकारार्थी मान हलवली तसेच ती पळत गेले. मी आदूला ते कागद काय आहेत विचारले त्यावर तिने मला पण ते काय आहेत सांगितले नाही, "Confidential Secret" आहे म्हणे. आम्ही परत साफसफाई केली.

रात्री आई बाबा ऑफिस वरून आल्यावर, जेवण वगैरे करून आम्ही निवांत गप्पा मारत होतो पण माझं मन मात्र त्या कागदांमध्ये असं काय सीक्रेट असेल त्यावरच होत. मी बाबांना हट्ट करून ते कागद काढायला लावले. बाबा काहीस नाहीच म्हणत होते पण मुलीच्या हट्टापुढे वडिलांचे काही चालले आहे का? मी, आई, बाबा बसलो. हळू हळू एक एक कागद काढले, जुने असल्यामुळे ते अगदीच जीर्ण झाले होते. बघतो तर काय ते कागद आजोबांनी आजीला लिहिलेले पत्र होते, त्यात खूप साऱ्या कविता पण होत्या. त्यावर आई बाबा हसले. आई हसून, "आपल्या आबांचे माईंवर किती प्रेम होते ना अहो?" बाबांच्या डोळ्यात टचकन आलेले पाणी पुसत, "हो ना!" मी मात्र गोंधळात होते. मी १५ वर्षांची असेल आबा गेले तेव्हा, आबांना जाऊन ७ वर्षे लोटली तरी त्यांच्या आठवणी कालच्या एवढ्या ताज्या होत्या. आई बाबांनी मला आदू आबांच्या प्रेमाची गोष्ट सांगितली.

त्यांच्यावेळेस प्रेम विवाह हा एक अपराध केल्यासारख होत. आदूच्या बाबांची लग्नाला मान्यता नव्हती. खूप मनावून पण त्यांचा होकार काय येत नव्हता, एक अनाथ मुलाला, ज्याचं गाव, कुळ काही माहित नाही अशा मुलाला त्यांची मुलगी देणं त्यांना मान्य नव्हते. आबा त्यावेळेचे गावातले सगळ्यात जास्त शिकलेले तरुण होते. कोणी पण बाप आपल्या मुलीच लग्न लावून देईल असं असताना फक्त प्रेम विवाह टाळण्यासाठी त्यांनी नकार दिला. आदूला तिच्या मामा कडे मुंबईला पाठवले. आणि आबांना खडसावले, "एवढच तुझे प्रेम असेल माझ्या मुलीवर तर ३ वर्षे थांब. ती graduate होऊन येऊदेत. तुझ्या इतकेच तिचे शिक्षणं असले पाहिजे. उद्या कमी शिकली म्हणून तिचा उद्धार, पाणउतारा नकोय." आबांनी तयारी दाखवली. तिकडे असताना ते दोघे फक्त एकमेकांशी पत्रातून संवाद साधू शकतं होते. तिचं ही पत्र. पण दीड वर्षात खबर आली की आदूच लग्न ठरलं, ते पण तिच्या मर्जीविरूद्ध. "बापरे, मग पुढे?" आई म्हणाली, "मग त्याचे पुढे असे झाले की रातोरात आबा मुंबईला मामा आजोबांकडे पोहचले. खूप तमाशा झाला. यांच्या आजोबांनी आपल्या आबांना धक्के मारुन काय हाकलवून लावले." "बापरे!" त्यावर बाबा, "पुढे काय झाले ते ऐकून बापरे म्हण. आबा हट्टालाच पेटले. लग्न करेल तर उषाचीच (आदूशी) नाहीतर नाही. जो पर्यंत तिचा हात देत नाही तोवर या उंबऱ्याशी बसून राहीन. माई आणि आईआजी मात्र रडवेल्या आल्या होत्या. आईआजीला, मामी आजी आणि मामा आजोबांना आपले आबा जावई म्हणून पसंत होते. आजोबा रागावून म्हणतात कसे, मी पण बघतो हा अजून किती दिवस थांबतो." 

पुढे बाबांच्या सांगण्यातून कळले की आबा भर श्रावणाच्या पावसात तीन दिवस उंबऱ्याशी बसून होते. शेवटी दगडाला पाझर पडतो तसा पणजोबांच्या काळजाला पाझर पडला म्हणायचं आणि त्यांनी लग्नाला मान्यता दिली. जसा आदूचा हात आबांच्या हातात ठेवला तोच आबांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. तीन दिवस उपाशी, पावसात भिजल्यामुळे त्यांना प्रचंड ताप आलेला. त्यांना तडक जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना दाखल करून उपचार होईस्तोवर आबांनी काय आदूचा हात सोडला नाही. डॉक्टर, स्टाफ नी प्रयत्न केले हात सोडवण्याचा पण काही केल्या आबांनी हात सोडला नाही. बेशुद्ध अवस्थेत पण घट्ट धरला. तेव्हा जो हात धरला तो वयाच्या ७५ व्या वर्षी सोडला. सगळ ऐकताना आणि सांगताना आम्ही तिघे डोळ्यातले अश्रू पुसत होतो. बाबा, "पोरी एक बाप म्हणून सांगतो माझा तुझ्या जोडीदाराला पूर्ण पाठिंबा आणि त्याच्यावर विश्वास असेल. तुझ्या विश्वासावर मला पूर्ण विश्वास असेल पण त्याला मात्र प्रेमाच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल आणि तुला पण त्याच्या प्रेमासाठी तू पात्र आहेस हे सिद्ध करावे लागेल." मी होकारार्थी मान हलवली. मी आई बाबांना पत्र वाचू का विचारल्यावर मी वयात आले आहे म्हणून त्यांनी परवानगी दिली. ती पत्र वाचून आदू आबांचे एकमेकांवर किती प्रेम होतं याची खात्री आणि जाणीव मला झाली.

मी सहज आदूच्या खोलीत झाकून पाहिले तर ती आबांचे हातातील कडे छातीशी पकडून काहीतरी पुटपुटत होती. मी जवळ जाऊन ऐकले तर ती आबांच्या नावाचा नामजप केल्या सारखे सारखं "शिशिर, शिशिर" म्हणत होती. ते म्हणताना तिच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य होते त्यावरून आबा आदूच्या स्वप्नातले राजकुमार आले असावे असा अर्थ मी काढला. हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला पप्पी देऊन मी तिला आणि तिच्या स्वप्नाला गुड नाईट म्हणून पळ काढला!




१३/०५/२०२५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Parallels That Never Met

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look