वाट
"यार आज वातावरण किती छान आणि प्रसन्न आहे ना, ट्रेक करायला मजा येईल एकदम" अपेक्षा म्हणाली. त्याला दुजोरा देत इमाम म्हणाला "हो अगदीच, फक्त रस्ते बंद केलेले नसावे फॉरेस्ट ऑफिसर ने". एमी आळस देत म्हणाली, "ते सगळं ठीक आहे पन आपण जरा ३ च्या ऐवजी ५ ला नसतो का भेटू शकलो, झोप नाही झाली आहे यार..." अर्चिस एमी ला कटाक्षात म्हणतो, "तसही तू गाडीत घोरणार तर आहेस. आणि ते जरा "न" आणि "ण" थोडा बघून घेत जा अग!" अपेक्षा वैतागून म्हणाली, "ते सगळं थांबवा रे...हा आशय कुठे राहिला यार, तो ग्रुप लीडर आहे, त्यालाच रस्ता नीट माहित आहे आणि त्यानेच उशिरा यावं, याला काय अर्थ आहे? मला नाही वाटत आशय उठला पण असेल, तो आळशीगोळा आहे, फोन करा त्याला आणि बघा कुठे आहेत महाराज?" क्रियाने आशयला किमान १५-२० फोन केले पण एक ही त्याने उचलला नाही. अपेक्षा त्यावर म्हणाली, "मला नाही वाटत आपण आज निघतोय वेळेवर, कॅन्सल समजा प्लॅन." त्यावर सगळ्यांनी तिच्याकडे त्रासिक आणि रागाने पाहिले तर ती म्हणते कशी, "बरोबरच बोलतिये मी." त्यावर अर्चिस तिला म्हणाला, "अपेक्षा नावाप्रमाणे जरा चांगल्या अपेक्षा ठेवल्यास तर जरा बरे होईल."
आशयची वाट बघता बघता तासभर उलटून गेला पण आशयचा काही पत्ता नाही, आता मात्र सगळ्यांना त्याची काळजी वाटू लागली. तेवढ्यात आशय समोरून रस्ता ओलांडून येत होता त्याच्या कपड्यांवर माती आणि रक्त दिसलं. आशय आल्याबरोबर सगळ्यांनी त्याला घेरल आणि प्रश्नांचा वर्षाव सुरू केला. शेवटी त्यांना थांबवत आशय म्हणाला, "आता माझं ऐकून घेताय कि नाही," आणि त्याने सांगायला सुरुवात केली. "तर त्याचं झालं असं की मी वेळेवर निघायच्या तयारीत होतो, मी हायवे ने येत होतो तेच पाहिलं तर एक गाडी divider ला ठोकली होती आणि माणसं बेशुद्ध अवस्थेत होती, आजूबाजूला सगळा शुकशुकाट आणि भयाण शांतता. त्यात त्यांना मदत करायला मी एकटा कुठे पुरणार होतो, तुम्हाला बोलविन म्हणतो तर नेटवर्क नाही. परत खाली ३ km येऊन मी मदत आणली आणि ५-७ लोकांनी मिळून त्यांना बाहेर काढले, ambulance मध्ये पोहचवले आणि मी तडक एकडे निघून आलो आणि त्यात उशीर झाला. खरंच क्षमस्व..." सगळ्यांनी मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाले, "तू बरा आहेस ना मग ठीक आहे." आशय उत्साहात चला निघुयात का? मी फक्त पटकन शर्ट बदलतो. आशय शर्ट बदलून येऊस्तोवर यांच्या गप्पा सुरू, अपेक्षा म्हणाली, "मला आपण पुढे जाणं बरोबर नाही वाटत आहे, ट्रेक सुरु होण्याआधीच असं काहीतरी घडून येणं मला चांगली चाहूल नाही वाटत." त्यावर क्रिया म्हणाली, "अरे हे गोष्ट आशयच्या हातात होती का? बरं नाही ना मग त्या गोष्टीचा संबंध जोडू नकोस." अर्चिस पण म्हणाला, "तुझ्या शंकेच्या पालीला Hit मारून पळव आणि चल. हीच नाव अपेक्षा नसून शंका असायला हवं होतं." आणि त्यावर सगळेच खो खो हसायला लागले. आशय शर्ट बदलून आला सगळे गाडीत बसले. आशयनी किती जण आले याची खात्री करायला मोजणी सुरू केली, कोणीतरी एक कमी आहे. पाहिले तर एमी नव्हती. एमी security च्या इथे झोपून होती. सगळ्यांनी जोरजोरात हाका मारल्या तेव्हा कुठे राजकुमारी जाग्या झाल्या आणि गाडीत येऊन बसल्या आणि परत अर्चीसच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपून गेली. सुयश, "मला वाटतं मागच्या जन्मी ही कुंभकरण असावी फक्त दोनच गोष्टी बरोबर येतात एक खाणं दुसरं झोपणं."
शेवटी हे लोक ट्रेकला जायला निघाले. तास दीड तास प्रवास करुन जवळच्या जंगलजवळ सगळे आले. त्यांनीं गाडी पार्क केली, फॉरेस्ट ऑफिसर नी त्यांचें डॉक्युमेंट verify केले आणि ६ वाजताच्या आत परत या असे सांगितले. वाटेत रेल्वे ट्रॅक आहे तर जरा कान उघडे ठेवा आणि सिग्नल वर लक्ष ठेवा. एक गार्ड सोबत घेऊन जाता का विचारल्यावर आशय म्हणाला, "तशी गरज वाटत नाही. जंगल तस ओळखीचे आहे, लहान असल्यापासून इथेच येतो आहे." त्यावर तिथे असलेला म्हातरबाबा म्हणाला, "काळ आणि वेळ दोन्ही सांगून येत नाही, प्रतिकूल परिस्थिती गरज आहे का नाही हे बघून येत नाही." त्यावर अपेक्षा परत चिंतेत दिसते, क्रिया तिच्या खांद्यावर हात टाकून तिचे समजूत काढते. एंट्री पास घेऊन सगळे ट्रेकला सुरुवात करतात.
पाच तास उलटून जातात पण तरी अजून मंदिर येत नाही. तिथलं मंदिर वाटेत लागतं ज्यावरून अर्धा रस्ता पार केला असं समजतं. बहुतेक ते रस्ता चुकले असावेत आणि आशय सगळ्यांना सांगतो जरा परत थोडं मागे जाऊयात. क्रिया म्हणते, "आशय अरे किती वेळचं आपण एकाच जागेवर गोल गोल येऊन थांबत आहोत. हरवू नये म्हणून मी वाटेत झाडावर लाल रंगाचं कापड बांधल आणि त्यावर मार्करने आकडे लिहिले. हे बघ ५ नं आकडा हा आता तिसऱ्यांदा आलाय. मी वैतागले आहे आता चालून चालून किती वेळचं चालत आहोत आपण, मला प्रचंड भूक लागली आहे. गेले पाऊण तास झाला आपण वाटच शोधतो आहे. मला वाटतं आपण विश्रांती घेऊ, थोडं खाऊयात आणि मग परत सुरू करू. काय म्हणता?" क्रियाची ही कल्पना सगळ्यांना पटली कारण ट्रेक सुरु करुन साडेपाच सहा तास उलटून गेलेले.
सगळ्यांनी आपल्याकडच खायचं सामान काढले, सुयशने चादर पसरली त्यावर बसून यांनी खाण्यास सुरुवात केली. सगळे अगदीच थकल्यामुळे कोणाच्या तोंडून एक शब्द पण फुटत नव्हता. आशय मात्र स्वतःच्या धुंदीत आणि विचारात मग्न होता. त्याला समोर असलेल्या डब्याचे सुद्धा भान नव्हते. तो या जागेतून आणि परिस्थितीतून वाट कशी शोधायची या विचारात तल्लीन झालेला. तो मनातल्या मनात विचार करू लागला, "या आधी पण खूप वेळेस आम्ही आलोय. दर ३-६ महिन्यातून एकदा तर नक्कीच, आज पर्यंत असं कधीच झालेलं नाही." तेवढ्यात एमी त्याला आवाज देऊन म्हणाली, "आशय अरे आधी खाऊन घे, मग आपण सगळे एकत्र विचार करू", यावर आशयने मात्र फक्त मान डोलावली आणि परत तो विचारचक्रात गढून गेला. यावर आपण आशयला थोडा वेळ देऊ असं म्हणून सगळे आपापला खाऊ लागले.
शेवटी नाश्ता करून परत सगळे ट्रेकला सुरू करतात. अजून तासभर जातो तरी यांना ते मंदिर काही लागत नाही. भुईचक्राप्रमाणे ते गोलगोल फिरून तिथेच येऊन थांबतात. आता मात्र सगळ्यांना थोडी चिंता सतावू लागते. इमाम परत जायचं सुचवतो. त्याचे म्हणणे सगळ्यांना पटते. परत रेल्वे ट्रॅक च्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतात. आता परत ५-६ तास मागे फिरून रेल्वे ट्रॅकला जायला लागणार होते. ६ तास उलटुन गेले तरी रेल्वे ट्रॅक लागला नाही. संध्याकाळचे ४ वाजले होते. रेल्वे ट्रॅक पासून एंट्री पॉइंट फक्त अर्धा तास पुढे होता. इमाम, "आत्तापर्यंत आपण रेल्वे ट्रॅकला लागायला अपेक्षित होतो पण अजून लागलो नाही. अजून किती वेळ!? आपण पुन्हा तर रस्ता नाही ना चुकलो असू?" अर्चीस, "देवा, अजून किती रस्ते चुकायचे म्हणजे आम्ही बरोबर रस्त्याला लागू? नाही लागलो तर घरचे रस्त्याला लावतील." अपेक्षा त्रासिक आवाजात, "या वेळेला पण कसं रे तुला मस्करी सुचू शकते? मी सांगितले होते, म्हणाले होते की नाही नव्हतो यायला हवं होतं. तुमचा अट्टाहास नडणार आहे. या क्रियाला नेहमी आयुष्यात adventure, thrill हवा असतो ना. घे झालं." सुयश, "अपेक्षा जरा शांत हो." क्रिया शांत आवाजात पण स्पष्ट सुरात बोलते, "आणि हो मान्य आहे, तुला भिती वाटत आहे, जी आम्हाला पण वाटते आहे. तुझ्या इतकेच, आपण सगळेच अडकलो आहोत या परिस्थितीत, तू एकटी नाही आहेस. हा blame game नंतर खेळलो तरी चालू शकतो. यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार करू जरा." अर्चिस क्रियाला शांत करतो, "ती घाबरली आहे. शांत घे." "मला मान्य आहे आर्चीस, आपण पण वेगळ्या परिस्थितीत नाही आहोत. तिची काळजी, भिती सगळं सगळं मान्य आहे पण आत्ता परिस्थिती काय, ही काय बोलते? सकाळपासून कुरबुर लावली आहे, ऐकून च घेतोय ना? घेतोय समजून, पण किती अरे. आणि मित्र आहोत यार शेवटी." इमाम आशयाला ३-४ हाका मारतो पण आशय मात्र विचार करत हळू हळू चालत होता, आपण यातून बाहेर कस पडायचं? कुठला रस्ता, कुठल वळण आपण चुकलो का? थोड्याच वेळात अंधार होईल त्या आधी गावाचा रस्ता मिळून त्या रस्त्याला लागायला हवं नाहीतर जंगलचे रस्ते बंद होतील मग दुसऱ्या दिवशी पर्यंत आपण असेच अडकून राहिलो तर? असे ना ना विचार त्याच्या डोक्यात विव्हळत होते.
अपेक्षा जोऱ्यात आशय ला हाक देत, "ए आशय, असं अजून किती वेळ चालत राहायचं आहे? सकाळी फुशारक्या मारत म्हणाला होतास ना मला सगळा रस्ता माहित आहे वगैरे मग आता काय झालं? आपण कसे हरवलो. मला नाही वाटत वाट मिळेल आपल्याला. आपण मदत घ्यायला हवी." सगळ्यांना अपेक्षा ज्या प्रकारे आशयला बोलली ते खूप जास्त खटकले. भले तिच्या बोलण्यात कितीही तथ्य असलं तरीही. आशय शांत पणे तिला बोलतो, "काळजी नको करुस, काही ना काही मार्ग नक्कीच मिळेल. तुला आणि सगळ्यांना बाहेर सुखरूप न्यायची जबाबदारी माझी." अपेक्षा रागात, "ती जबाबदारी वगैरे मोठे शब्द राहूदे बाजूला आधी बाहेर कसे पडायचे ते बघ. जवळचे पाणी पण संपलय आता. त्या एमी चा चेहरा बघ कसा उतरला आहे." एमी, "काही नाही रे आशय. तू नक्कीच रस्ता शोधशील. आणि मी किव्हा आपन (आपण) काय एवढे लहान नाही की पान्याची (पाण्याची) कळ काढू नाही शकत. माझी Granny म्हणते जेव्हा आपण वाट चुकतो तेव्हा आपण हार नाही मानायचे. जेव्हा वाट दिसणं बंद होत तेव्हाच खरं उठून वाट शोधायची म्हणजे वाट आपल्याला शोधत येते. चला चला चालत राहू. ते बघा ट्रॅक च्या सिग्नल सारखं काहीतरी चमकत आहे. बघू पुढे जाऊन." अर्चिस, "बाई तुझं न न ऐकून माझ्या डोक्याला कळ लागली बघ..." एमी, "ए तू गप रे" असे म्हणून एमी आशयचा हात पकडते आणि पुढे चालत राहते. त्यांना बघून हळु हळु सगळेच पुढे चालु लागतात.
तेवढयात सकाळचा म्हातरबा त्यांना आवाज देतो, "काय पोरांनो, कशी झाली तुमची फ्रेक, मज्जा केली का नाही?" सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. ते काही उत्तर देणार तेवढयात म्हातरबा म्हणतो, "बोलण्यात नंतर वेळ घालवू, अंधार पडत आला आहे. लागलीच थोडे जलद चाललो तर पोहचू २० मिनटात. चला लवकर या पोरांनो" असे म्हणत म्हातरबा चालू लागतो. सगळे त्याच्या मागे चालू लागतात. अवघ्या १५ मिनटात ते एंट्री पॉइंट ला येतात. तोच गेट जवळ म्हातारबाला बघून सगळे आश्चर्यचकित होतात. सुयश मागे वळून, "बाबा तुम्ही तर आमच्या सोबत होतात ना?" बघतो तर काय मागे, आजूबाजूला कुठेच म्हातरबा नाही. तो सगळ्यांना सांगतो. तोच म्हातरबा समोरुन हसून, "काय पोरांनो कशी झाली फ्रेक्? मज्जा केली की नाही? वाट तर नाही ना चुकलात?" एमी त्यांच्या जवळ जाऊन, "तुम्ही असताना कशी काय वाट चुकू? तुम्ही आलाच असता की नाहितरी शोधत. आणि ते ट्रेक असत हो फ्रेक नाही. म्हातरबा हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना म्हणतो, "तेच ते. चला जेवायला या मग आता, थकला असाल ना?" अपेक्षा, "नाही जेवण वगैरे नको, चांगलीच भूक भागली. थोडी तहान लागली आहे. पाणी मिळेल?" सगळे अपेक्षा कडे बघतात आणि नकारात्मक मान हलवतात. सुयश तोंडातल्या तोंडात "अशक्य व्यक्तिमत्त्व " पुटपुटतो. सगळे पाणी पितात आणि निरोप घेतात, "असो चला आम्ही निघतो आता पुढे अजून खूप प्रवास करायचं आहे."
सगळे गाडीत बसतात. जाताना शेवटचं म्हातारबा ला टाटा करतात. म्हातारबा, "नीट, सावकाश जा पोरांनो, दिन मावळला." सगळे हो म्हणतात आणि निघतात.
एमी झोपेत पुटपुटते, "वाटेत कितीही अडथळे आले तरी वाट चालायचं थांबायचं नाही! वाट नक्कीच शोधत येते!" सगळे ते ऐकतात आणि गालातल्या गालात हसतात.
06/08/2023
11/12/2024
Khup sundar lihilayes!!! Your words have a magic! Keep growing, keep writing!
ReplyDeleteThank you ❤️❤️❤️
Delete