मृगांक
आज खूप दिवसांनी धावपळीतून, जबाबदारीतून, नित्यकामातून निवांत असा ब्रेक मिळाला आहे. ३ महिनांच्या लगबगीनंतर निवांत सुट्ट्या काढल्या आहेत. थोडा वेळ घरच्यांना, मित्रांना देऊन स्वतःसाठी असा राखून ठेवला आहे.
तर आज विकेंड ला आम्ही सगळे कॅम्पिंग ला आलोय. मस्त रात्र झाली आहे, डिसेंबर महिन्याच्या थंडीत आम्ही सगळे शतपावली करायला म्हणुन बाहेर पडलोय, खूप काळोख एवढा की अगदी माझ्या बाजूला कोण उभा आहे हे टॉर्च शिवाय दिसत नाहीये. थोडं चालून आम्ही सागर किनाऱ्यावर थोडा वेळ बसायचं ठरवलं. खूप थंडी असल्यामुळे शेकोटी पेटवली आणि तिच्याभोवती गोल करुन बसलो. अश्या आमच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या, हसत खिदळत आमचं आयुष्य कसं चाललंय आम्ही सगळे बोलत होतो, थोड्या वेळाने गाणी लावून सोबत गात होतो, नाचत होतो. थोडे खेळ खेळलो आणि आता सगळे थकले म्हणुन शांत बसलो. नीरव शांतता पसरली होती, असं झालं होतं की सगळ्यांना ती शांतता हवीहवीशी वाटत होती. आम्ही सगळे आजूबाजूला बघतोय, समुद्राच्या लाटा किनाऱ्याला लागूनच परत जात होत्या, अगदीच वाटलं तर आमच्या पायांना हलकेच स्पर्क्ष करुन परत पळून मागे जात होत्या. खूप छान वाटत होती ती शांतता.
वारा अवतीभोवती शीळ घालत आहे, आकाशात तारे लुकलुकत आहेत आणि अचानक माझी नजर मृगांकवर गेली. मृगांकला पाहून मनात खूप शीतल असे भाव दाटले. तशी माझी आणि त्याची भेट रोजच होत असते पण तरी आज काही नवखे अप्रुप वाटत होते त्याच्याविषयी. एक वेगळीच ओढ, गोडी, लगाव जाणवत होता. अस वाटतं होतं तो मृगांक मला सांगतोय,"आज काय तो तुला मला वेळ देता येतोय, रोज फक्त मला क्षणिक बघून तू निघून जात होतीस, आज तुला असं मला निरखून बघताना मला तुला घट्ट मिठीत घेउन कधीच सोडू नये असं वाटतंय. रोज मी तुला फक्त दुरून बघत होतो, तुझ्या एका नजरेची आस घेउन येत होतो पण तुझी नजर माझ्यावर खेळलीच नाही, आज तुला असं माझ्याकडे एकटक बघताना मला तुझ्या नजरेत लुप्त होऊन जावं असं वाटतंय." जे मृगांक ला वाटत होतं तसंच काहीतरी माझ्याही मनात चाललं होतं.
मी स्वतः मध्ये एवढी गुंग आणि दंग होते की मृगांकला कधी डोळे झरून, आसव भरुन बघताच आले नाही. पण तो बिचारा मात्र एकाकी आसव घेऊन तसाच माझ्याकडे बघत असणार. असे वाटतं होतं की थट्टेने मृगांक मला म्हणतोय, "काय ग सखे न आठवूनी(विस्मरूनी) मला केलेस हे दूर असे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न स्मरता गेलीस तू अशी पुढे, पण मी मात्र तसाच एकाकी उभा हताश तुझ्या एका नजरेच्या आशेत. रोज माझ्या वेगळ्या कलांनी छटानी चाहले मी तुझे लक्ष, पण तू मात्र होती गुंग तुझ्याच विश्वात. चंद्र किरणे वेधती तुझे एक लक्ष का कळेना, दिसेना तुला माझे हे विफळ प्रयत्न."
फक्त नजरेच्या इशाऱ्याने आमचे हे बोलणे मनाला अगदी भावून गेले. तेवढ्यात मागून येणाऱ्या हाकानी माझे व त्याचे संभाषण खंडित केले. मी मृगांकला बघून हलकेच हसले आणि टाटा बोलले. माझ्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य बघून सगळेच गोंधळात होते पण मी मात्र मृगांकला माझ्या मनात बिंबून पाऊले पुढे टाकत होते.
मृगांकच्या कलांनी मला ही जाणीव करुन दिली की आयुष्य हे कधीच नीरस नसतं, आपण त्याला नीरस समजून ते तसच जगण्याचा अट्टाहास कशासाठी करतो? मृगांक सारखं आपलं हि आयुष्य वाढत्या उतरत्या कलांनी भरलेल आहे पण आपला जोर मात्र उतरत्या कलांनी वेढलेल्या मृगजळामागे वेढलेले आहे, त्यातून उभारून आपण वाढत्या कलेकडे कधी चढणार?
PS: मृगांक येथे चंद्राला उद्देशून लिहिले गेले आहे.
Thank you Omkar Thite for the motivation ☺️
Thank you Anushree for editing 🤗
Comments
Post a Comment