आठवणीतला बाबा ...
सगळीकडे नुसता गुंता... भावनांचा आणि ह्या गुंत्यामध्ये माझी होणारी गुंतागुंत. नक्की पहिले काय आवरू आणि कोणता गुंता सोडवू काही समजत नाहीये. माझ्या मनात घुटमळणाऱ्या भावनांचा गुंता सोडवू की त्या भावनांमुळे होणारा आयुष्याचा गुंता सोडवू? काही समजत नाहीये.
माझ्या मनात भावनांच्या, आठवणींच्या गुंत्याचे काहूर माजलं आहे.
या दुःखाच्या प्रसंगी माझे आपले माझ्या सोबत माझी हिम्मत बनून कायम आहेत. मला एकटे पडू न देता माझा एकटेपणा कसा दुर होईल हाच त्यांचा हेतू आहे. मला सावरत आहेत, आईला सावरत आहेत. माझ्या चेहऱयावरील हसू परत आणण्यासाठी प्रयत्न करतायेत. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यामुळे मला जी निराशा आलीये, मनावर जे दडपण आले आहे ती दुर लोटण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
माझ्या मनाला ओळखून त्याला सावरणारे माझे बाबा काही महिन्यांपूर्वी हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा ते आता कधीही माझ्या सोबत नसणार याचे दुःख होतंय. माझ्या मनातले भाव न सांगता ओळखणारा माझा बाबा का बरं मला सोडून गेला? त्याच्या जाण्याने सगळं गुंतागुंतीचे वाटतंय. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा तो आता नाहीये. माझ्या गुणांवर, माझी पाठ थोपटणारा तो नाहीये, आता कोण माझी स्तुती करणार? रोजचे किस्से सांगत हसणारे आम्ही, आज, दुरावलोय आणि ते पण कायमचे. जर मी आईशी नाळेने जुळले आहे तर मी बाबाशी मनाने जुळले आहे. त्याचे अस्तित्व देह म्हणून जरी नसले, तरी ते माझ्या मनात कायम स्तिथ आहे. त्याच्या आठवणी मनात खोलवर रुजल्या आहेत.
ताई म्हणते, "काही गोष्टी सोडल्याकीच माणूस आनंदी राहतो आणि त्यात गुंतलो की त्यातच तो मरत राहतो". पण मी तर माणसात गुंतले आहे, ते पण माझ्या बाबांच्या. कश्या सोडू त्या आठवणी, ते सगळे प्रेम, त्या सगळ्या सुस्ती, ती क्रिकेटची मॅच सोबत बघणे, आईला नकळत चिडवणे, नक्की काय आणि कसं विसरू? बाबा असताना तो एक एक पैसा जोडून आमच्यासाठी सगळी सुख द्यायचा आणि आज तो नसताना आमची स्वप्नं पूर्ण करताना एक एक पैसा जेव्हा जोडावा लागतोय तेव्हा पदोपदी त्याची आठवण येत आहे, त्याने उपसलेल्या कष्टाची जाणिव आज होतिये. अगणित आठवणी आहेत त्याच्या आणि त्या आता फक्त आठवणी राहणार! हा आहे माझा गुंता. कसा सोडवू याला? काय करू मी? परिस्थिती, वास्तव तर बदलणार नाही मग तिच्याशी तडजोड करण्याची, तिला सामोरे जाण्याची ताकत एकवटुन तिला सामोरे जावे लागणार.
पदवी प्रदान समारंभात त्याची खूप आठवण येते होती कारण खूप स्वप्न पाहिली होती मी, आम्ही; बाबाला माझी डिग्री देण्याची, सगळ्यांसमोर त्याला गर्वाने माझे बाबा आहे हे सांगायची. माझा पहिला पगार माझ्या देवाच्या, माझ्या बाबाच्या हातावर ठेवण्याची, माझ्या घरात त्याचे आशीर्वाद घ्यायची, माझ्या प्रेमाला त्याची भेट घालवून देण्याची, माझ्या लग्नात त्याला मिठी मारून "नाही जायचे तुला सोडून" हे सांगायचे अशी खूप लहान मोठी स्वप्ने मी पाहिली होती. आता सगळेच संपल्यासारखे वाटत आहे. पण तरीही आम्ही पाहिलेली स्वप्ने मी पूर्णत्वाला नेणार. माझ्या स्वप्नांमधून मी कायम त्याला माझ्या बरोबर जगवणार.
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा तो मला अनाथ करून केला असे वाटत होते. कोण आता मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवणार? कोण पाठ थोपटून अभिनंदन करणार? कोण माझ्या बरोबर मिळून आईची थट्टा करणार? कोण? जे होते ते आता राहिले नाही आणि जे आहे ते रुचत नाही. तरीही आई या परिस्थितीत खंबीरपणे उभी आहे. प्रेमाने, मायेने आम्ही बाबाची कसर भरून काढतोय. एकमेकांना समजून सावरतोय.
रात्री उशीरा दमून भागून जरी आला असला तरी मला पाहिल्याशिवाय माझा बाबा झोपी नाही जायचा आणि आज मात्र कायमचा निरोप घेऊन गेला. पण तेच आज आई आमच्या स्वप्नपूर्ती साठी झटत आहे, राबत आहे. ती सुद्धा जेव्हा कामावरून थकून भागून येऊन आडवी पडते, तेव्हा तिच्या मध्ये सुद्धा मला माझ्या बाबांचा भास होतोय, जाणीव होती आहे की तो असताना आम्हाला कशाची कमी नाही भासू दिले, मागेल ते आणि हवेल ते त्याने दिले. मला प्रेमाने घास भरवायचा आणि आज एक घास सुद्धा गळ्याखली नाही उतरत आहे. देव निष्टुर म्हणावा का माझे दैव अभागी? तो असताना एक वेगळाच रुबाब होता माझ्यात, त्याच्या असण्याने मी होते. माझे अस्तितवच त्याने घडवले होते. जाताना सुद्धा कमावलेले सगळ डबोलं माझ्या नावावर ठेवून गेला. आज बाबा तर नाहीत माझ्यासोबत पण त्यांच्याच रूपाने माझी आई माझ्यासोबत आहे आणि ती एकाच वेळेला आई आणि बाबांची भूमिका बजावतीये. भक्कम पणे उभी आहे माझ्या पाठीशी.
पण नाही मला आता हिम्मत हरून चालणार नाही. मला खचून जाता कामा नये. बाबा सोबत नसला म्हणून काय झालं, आठवणीत तर आहे ना. आईचा एकुलता एक आधार आता मीच आहे, तिला सावरायचे आहे. आम्ही माझ्यासाठी पाहिलेली सगळी स्वप्नं मी पूर्ण करणार. माझा बाबा माझ्यासोबत कायम राहील....... माझी जिद्द, माझा विश्वास, आधार सगळे बनून.
👌
ReplyDelete