लेक चालली सासुरा.....

 लगबग सुरू आहे.... कशाची काय अहो, आमच्या एकुलत्या एका मुलीच्या सार्थकीच्या लग्नाची, दोन दिवसांवर आलय. "२५ वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आमची चिंगी (लाडाने) आज लग्नाची झाली. शाळेत जाताना आमचे बोट सोडवत नव्हते हो तिला!.... आणि आज आमची ठमा (लाडाने) बोहल्यावर चढणार आहे." बाबा जड आवाजात बोलले. मागून आईचा दुजोरा, "काय सांगायचे आता हिचा जेव्हा जन्म झाला होता ना तेव्हा हिला पाहिल्यावर आमच्या ह्यांना हिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. त्यांना हिच्या येण्याने जणू जन्म सार्थकी झाला असे झाले, म्हणून हीचे नाव आत्या बाईंनी सार्थकी असे ठेवले."  हो तर एका मुलीच्या जन्माने घरात जणू लक्ष्मी, सरस्वती येतात. 

(रात्री झोण्यापूर्वी आई बाबा आपल्या लाडकीचे लहानपणीचे फोटो पाहत आठवणींमध्ये पार बुडून जातात. तिच्या सगळ्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर जिवंत होऊन तरंगत असतात) प्रेमाने फोटो वर हात फिरवत आई म्हणाली, "किती स्वप्नं पाहिली होती हो आपण हिच्यासाठी, त्यातलेच एक हिच्या लग्नाचे. काय हो सगळे ठीक होईल ना? काय माहित का पण मनाला सारखी हुरहूर लागली आहे बघा, कसे होईल? नीट होईल की नाही? मानपान व्यवस्थित व्हायला हवा, कुठे काही कमी नको राहायला." बाबा समजावताना म्हणाले "अगं लग्न समारंभ म्हणला की कुठे तरी कमीजास्त हे होणारच. आपण सगळी व्यवस्था जातीने पाहतोय. कुठे तरी कोणाला तरी काहीतरी कमी वाटणे साहजिक आहे; पण असो आपल्या मुलीसाठी आणि आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे बघ. लग्नाच्या तयारीमध्ये इतके गर्क झालो आहे की डोळे भरून पोरीला बघता पण येत नाही गं. तुझं आपलं चांगलं आहे, आई म्हणून नेहमी मागे पुढे असतेस तिच्या." त्यावर आई, "छे हो काहीही काय! पाहुण्यांच्या वर्दळीत मोकळा श्वास घेतला की आपोआप नजर तिच्याकडे जाते. तिचा हसरा चेहरा पाहून मनाला बघा कसे समाधान होते. काल तिला तयार करताना की नाही मला तिचे लहानपणीचे शाळेत जातानाचे दिवस आठवले, कसे तिला मी स्वतःच्या हाताने तयार करायचे; तिच्या त्या पिटुकल्या वेण्या, त्यांना रिबीन, पॉलिश केलेले बूट सगळं आठवतंय. आणि काल तिला साडी नेसवताना मला आपली ७ वर्षाची पोर आठवली, अगदी माझी साडी नेसून "आई मी कशी दिसते आहे विचारणारी?"आजपर्यंत तिच्या आवाजाने होणाऱ्या माझ्या दिवसाची सुरुवात आता तिच्या आठवणीत होणार बघा. काय हो सासरी गेल्यावर तिला आपली आठवण येईल ना? तिच्या सासूबाई लग्नाआधीच मुलीप्रमाणे जपतायेत म्हणून आपलं म्हणलं." "तुझं पण अगदी काहीतरीच काय सौ. अगं वेडे, पिल्लू आईला कधी विसरते का.... फरक एवढाच की आता आपली पोर दुसऱ्याच्या घरी जाणार". 

"काय हो तिला सगळ्या चाली-रिती शिकून त्या प्रमाणे वागायला जमेल का? सगळ्यांचे मन जिंकून घेऊन तिचे स्थान ती कसे मिळवेल? विचारांची पाल चुकचुकली की असे काहीतरी होते. मी पण आपलं काहीतरीच बोलते आहे. का नाही जमणार अहो तिला, सोन्यासारखे सासर मिळाले आहे, जावई मनाने चांगले आहेत, सांभाळून घेईल आपल्या चिंगीला. आई-बाबांप्रमाणे माया करणारे सासू सासरे मिळणे हे भाग्यच म्हणायला हवे. त्या वर बहिणीसारखी नणंद म्हणजे काय सुत जुळले आहे बघा!" "अगदी बरोबर बघ! तरी आई म्हणून तुझ्या मनातल्या चिंता मला कळणार नाही का? तू हे व्यक्त तरी करतियेस अगं, मला कुठे आलंय तेवढे स्वात्यंत्र. बापाचं काळीज.... जीव जड झालाय तिला सासरी पाठवायच्या विचारानेच...." 

(आई बाबा आठवणींमध्ये रमले असता तोच मागून आवाज आला) "हे काय तुम्ही अजून झोपले नाही? नेहमी मला म्हणता लवकर झोपत जा आणि हे काय? (हातातल्या अल्बम कडे पाहत सार्थकी म्हणते)" आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणते "काही नाही गं असेच जुने फोटो पाहत आठवणींना उजाळा देतो आहोत. तुझे लग्न होऊन तू आता सासरी जाणार, बघता बघता किती मोठी झाली आमची चिमणी....." सार्थकी आईच्या मांडीवर अलगद डोके ठेवते तोच आई प्रेमाने हात फिरवत तिचा मुका घेते. "हे काय अगं आई, रडतेस काय?, मी कुठे लांब चालले आहे, तुझ्या जवळ आहे, ही बघ अशी! तू म्हणत असशील तर कुठे नाही जात बघ." बाबा हसून म्हणतात "नाही गं पोरी. तुझी आई जशी सगळ्यांना सोडून आपल्या घरी आली, सगळ्यांना आपलेसे केले, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तसेच आता तुला करायचे आहे. तुझ्या जाण्याच्या दुःखापेक्षा तुझ्या लग्नाचा आनंद जास्त आहे आम्हाला. पोरी... कामाच्या व्यापात तुला सांगायचे राहिले बघ, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तू अगदीच सुंदर दिसत होतीस..... एकाद्या सुंदर परिसारखी!...." 

"बाबा, तुमचे हेच शब्द ऐकायला आलेले. कारण आजपर्यंत बाबांनी माझे कौतुक नाही केले असे झाले नव्हते. बाबा आज आपण सगळे एकत्र झोपुयात अगदी तसेच, जसे मी लहान असताना तुमच्या दोघांमध्ये तुमच्या कुशीत झोपायचे. आज की नाही तुम्ही मला माझी आवडती गोष्ट पण सांगा म्हणजे की मला झोप येईल....." असे म्हणत (सार्थकी अलगद आई बाबांच्या कुशीत झोपी जाते.) आई बाबा मात्र डोळे भरून आपल्या पोरीला बघत असतात. 

Comments

  1. It's very relatable 😞🤩...very nice😍

    ReplyDelete
  2. डोळे भरून आले हे वाचत असताना! खरं तर मी एकटी नसेल च जी रडली हे वाचून .... खूप सुंदर लिहलय ग....

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much 💕 I'm glad you can relate to it 💗 keep loving ❣️

      Delete
  3. Khup ch sundar vachun dole bharun ale😢❤

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Parallels That Never Met

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look