साथ
साथ, सोबत... प्रत्येकाला हवीहवशी वाटणारी. आयुष्याच्या प्रवासात कोणीतरी सोबत असावे, साथ देणारे असावे असे प्रत्येकाला वाटते. काहींना आईवडिलांची, बहिण भावाची, आजी आजोबांची, मित्र मैत्रीणींची तर काहींना प्रेमाची. सुखदुःखात, खडतर परिस्थितीत, आयुष्याच्या चढाओढीत कळते की कोण आपल्या सोबत आहे आणि कोण आपली साथ सोडून गेले. जिवाभावाचे, जिवलग म्हणून म्हणवणारे हा हा करता साथ सोडून जातात तेव्हा कळते माणसाला आपली आणि त्यांची खरी किंमत, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि जे अपेक्षांवर उतरले ते आयुष्याचे खरे सोबती. ज्यांच्याकडून सोबतीची अपेक्षा असते तेच लोक त्यावेळी अपेक्षाभंग करून साथ सोडून जातात आणि ज्यांच्या कडून आपण कधीही कशाचीही अपेक्षा करत नाही ते लोक मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साथ निभावतात. पण कधी कधी ह्या साथीचा, सोबतीचा स्वार्थी हेतूने वापर होतो. कर्णाच्या मैत्रीच्या साथीमुळे, तो कायम आपल्या सोबत राहील या हेतूने दुर्योधन अधर्म करतच राहिला, असे नाही की कर्णाने अडवले नसेल पण तो त्याच्या उपकाराच्या आणि मैत्रीच्या नात्यात अडकला होता. आई वडील आपण कसेही वागलो तरी आपली साथ कधी सोडणार नाही हे प्रत्येकाला वाटत असते पण ते असे वाटून देणारे आई बाप चुकीचे नाही का हो?
आजकाल तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुमच्या मागे पुढे करतील,पैसा असेल तर चार लोक तुम्हाला विचारतील नाहीतर तुम्ही कोणीतरी अनोळखी आहात असे वागतील हे आपण नेहमी ऐकतो, अनेकांच्या बाबतीत ते अगदी खरेच ठरते. तुमच्या सोबतीची आणि साथीची तुलना पैशांमध्ये केली जाते, काही नाती आणि काही लोक अपवाद असू शकतात. कृष्ण सुदामाच्या मैत्रीची साथ हे एक त्या अपवादाचे उदाहरण. आणि द्रोणाचार्य ध्रुपद हे पैसा, श्रीमंती असणे गरजेचे आहे हे दाखवणारे उदाहरण; द्रोणाचार्यांकडे गरीबी म्हणून भरलेल्या राज्यसभेत ध्रुपद त्यांच्या गुरुकुलातील मैत्रीची साथ आणि सोबत अमान्य करून फक्त ओळख असल्याच सांगतो.
लग्नात सप्तपदी घेताना, सात पदांचे आणि वचनांचे मोल जाणून घेताना साता जन्माच्या गाठी आपण एकमेकांसोबत बांधतो. काहीजण त्या गाठी निभावतात ही. मरणोत्तर ती साथ निभावतात. पण काही वेळेस त्या गाठी आणि पर्यायी नाती तुटक का होतात? काय कमी राहते? प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, आदर, विश्वास, निष्ठा? का अचानक ती नाती पोकळ बनतात आणि त्या साथी तुटतात? खूप नाजूक असतात म्हणे, मग ती नाजुकता आणि कोमलता सांभाळायला धैर्य नको का? अनाठायी निर्णय, टोकाची भूमिका घातक परिणाम दर्शवते.
साथ ही खूप मौल्यवान असते, आणि ज्याला ती मिळाली तो नशीबवान; श्रीरामासारखे म्हणा ना अगदी, त्यांना जशी वानर सेनेची साथ मिळाली आणि त्यांनी जसा रावणाचा पराभव केला हे त्यांना मिळालेल्या साथीचे उत्तम उदाहरण. साथीच्या सामर्थ्यावर माणूस काहीही गमावू शकतो आणि मिळवू ही शकतो. वाईट मित्रांच्या साथीत, सोबतीत राहून कितीही नाही म्हटले तरी आपण वाईट गोष्टींकडे ओढले जातो. मित्र मात्र निमित्त पण ती सर्वस्वी आपली जबाबदारी असते की वाईट मार्गांकडे, वाईट सवयींकडे दुर्लक्ष करणे.
कोणाची साथ अशीच नाही प्राप्त होत, ती मिळवण्यासाठी आणि मिळालेली साथ जपून ठेवण्यासाठी खूप परिश्रम असतात. त्या सोबतीत विश्वास, निष्ठता, आदर, प्रेम असेल तर ती साथ मौल्यवान.
सप्तपदी चा परिच्छेद खूप आवडला.. नव्हे पटला 😍
ReplyDeleteCredit of idea goes to you😀
DeleteEkdam mast😍
ReplyDeletePerfect examples are given ❤👍
Means a lot 😃😃
DeleteIts really nice 😍
ReplyDeleteNice 👌❤️
ReplyDelete