ते दोघे...

ते दोघेही जगासाठी अगदी बाकी प्रियकर प्रेयसीसारखेच होते पण त्यांचे नाते मात्र त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळे बनवत होते. त्यांच्या नात्यात प्रेम तर होतेच पण त्यापलीकडे एकमेकांसाठी आदर होता. त्या नात्यात एक वेगळाच असा गोडवा होता जो भांडणं झाल्यानंतर आलेला तिखटपणा सावरत होता, डोळ्यांतील अश्रू वाहू नये म्हणून प्रेमाचा गोडवा वाढवत होता. प्रेमापलीकडे त्यांच्या नात्यात रुसवेफुगवे, अगणित विनोद त्यातून हास्य, आनंद होता. एकत्र जगताना कधी ते एकमेकांसाठी जगू लागले कळलेच नाही, कधी एकमेकांची सवय बनून गेले कळलेच नाही. चिडून बसलेल्या तिला तो बोलता बोलता कधी नकळत हसवायचा कळायचे नाही आणि चिडलेल्या त्याला तिच्या फक्त प्रेमाने बोलवण्याने कधी राग जायचा ठावूक नव्हते. तिला दुःखी पाहून कधीही त्याने तिला ना कधी एकटे सोडले ना तिची साथ; जोपर्यंत तिच्या चेहऱ्यावर हसू त्याला दिसत नव्हते तो पर्यंत तो प्रयत्न करायचा. तो कधी दुःखी असला तर मात्र तिला राहवत नसे, आपला आनंद आज दुःखी का हा प्रश्न तिला पडायचा आणि तीही त्याला परत आनंदित करण्यासाठी प्रयत्न करायची पण हा बाबा काय हसतोय! त्याची तऱ्हाच थोडी वेगळी होती, राग आला तर तो दिवस दिवस जात नसे नाहीतर सांगितले तसे एक प्रेमळ हाक पण पूरेशी. 

दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते पण कधी कधी नकळत केली गेलेली कृत्ये महागात पडतात. नाती बनवायला आणि बनायला वेळ लागत नाही पण ती जपण्यात आयुष्य खर्ची होते. तसेच ती तोडायला एक क्षण पुरेसा असतो पण ती जोडून ठेवायला माणूस झटत असतो. विणल्या गेलेल्या त्या नात्याला कधी एक गैरसमज भोक पाडेल सांगता येत नाही. सगळे चांगले चालू असताना अचानक त्याच्या अपेक्षा नकळत वाढत जातात. तो काहीही न लपवता तिच्यासमोर त्या व्यक्त सुद्धा करतो, ती मात्र ते सगळे ऐकुन गोंधळून जाते, काय करावे काही समजत नाही, त्याला गमवायचा विचार ही तिला करवत नव्हता, शेवटी पहिले प्रेम होते ते. पण त्याच्या अपेक्षा तिच्या तत्वात बसत नाहीत आणि तरीही नाते टिकवायचे का नाही याचा निर्णय ती त्याच्यावर सोपवते. त्याला ही तिला गमवायचे नसते म्हणून तो ही अपेक्षा विसरून एकत्र रहायचे ठरवतो. पण तो संयम जास्त दिवस नाही राहू शकला, त्याच्या अपेक्षांवर आता त्यालाही संयम ठेवता येत नव्हता आणि एकदिवस अचानक तो तिला सांगतो की "आपले काही भविष्य नाही, मी तुझ्या बरोबरीचा जीवनसाथी नाही तुला माझ्यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळेल!" असे म्हणून तो कायमचा संबंध तोडून, वाऱ्याच्या आलेल्या अलगद झुळुकी प्रमाणे तिच्या आयुष्यातून निघून गेला, जाताना एकदा ही वळून नाही पाहिले, पाहणार तरी कसा? वळून पाहिले असते तर त्याला तिची साथ सोडवली गेली नसती. ती पार तुटून गेली, आपण कुठे चुकलो, कमी पडलो याचा विचार करू लागली पण काही समजेना. आपण त्याची अपेक्षापूर्ती नाही करू शकलो यामुळे तर त्याने आपली साथ नाही ना सोडली? असा विचार करून तिने स्वतःला समजावले. हळूहळू त्याला विसरायचा प्रयत्न करत राहिली. नवीन प्रेमाची सुरुवात केली पण त्याची आठवण कायम मनात ठेवून (नवीन जोडीदाराला कल्पना देवून) अपार निष्ठेने नवीन नाते जोपासू लागली पण तेही जास्त काळ नाही टिकले आणि ते ही तुटले. पहिल्या प्रेमाचे विचार अजून जास्त मनात घर करू लागले.

तो मात्र तिकडे एकाकी पडला होता. आपण आपल्या प्रेमावर अपेक्षांचे ओझे टाकले ह्या विचारात स्वतःला दोष देत राहिला. तिच्या येण्याने सोडलेल्या दारू, सिगरेट ची तलप त्याला परत खेचू पाहत होती आणि ती यशस्वी पण झाली. 

आज इतके वर्षे ओलांडली पण अजूनही तो परत आला नाही, अधूनमधून झालेल्या बोलण्यात वारंवार तिने त्याची माफी मागितली, परत येण्याची भिक मागितली पण तो ठाम होता त्याच्या निर्णयावर. तो आजही स्वतःला त्या अपेक्षांच्या मागणीसाठी माफ करू शकला नव्हता. आजही तो स्वतःला तिच्या योग्य समजत नव्हता. 

दोघांच्या विश्वासावर गैरसमजाने आपले पाय पसरले आणि त्यांच्या सुंदर नात्याचा शेवट होऊ पाहिला. दोघांनी प्रयत्न केला एकमेकांशिवाय पुढे जायचा, आयुष्य जगायचा पण एकमेकांचे अस्तित्व कायम त्यांच्या मनात घर करून राहिले. एकमेकांच्या संपर्कात जरी नसले तरी आठवणीत निरंतर आहेत.
picture credit: sketch by Meghna Pujari. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Parallels That Never Met

गोंधळ, आणि ओळखीची कुजबुज

त्या एका नजरेनंतर After That One Look