आयुष्य एक प्रवास! (Marathi)
"आयुष्य" हा ऐकायला फक्त एक शब्द जरी वाटला तरीही त्याला खूप अनमोल असा अर्थ आहे. आयुष्य हे माणसाला खूप मोठ्या मोलाने मिळते असे म्हणतात, पण मिळालेल्या प्रत्येकाला ते क्वचितच जगता येते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो ते जगण्याचा, मग ते पडत धडपडत मार्ग काढत असो किंवा कोणाच्या प्रेमात पडून असो, नाहीतर कोणाच्या तरी आदेश उपदेशांवर असो. पण आपल्याल्या मिळालेले आयुष्य माणूस स्वतःपेक्षा ते दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो. आपल्याला अशी खूप उदाहरणे पाहायला मिळतील जे निःस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी झटत असतात.
आयुष्य एक मोठा प्रवास आहे सुखदुखांचा, आशेचा, मायेचा, खडतर आणि कठीण परिस्थितींचा, परोपकरांचा, स्पर्धेचा, अगणित संधींचा. पण सगळ्यात जास्त तो मार्ग आहे ते जगण्याचा. खडतर आणि कठीण परिस्थिती, प्रसंग तर येतच राहतील पण त्यांना खचून न जाता त्याला धैर्याने सामोरे जात मार्ग काढणे म्हणजे आयुष्याचा प्रवास. आयुष्यात परोपकार करत रहा पण कधी उपकाराची भाषा करू नका. आयुष्याच्या ह्या प्रवासात अनेकांचा मित्र, साथीदार, सारथी बना पण कोणाचाही शत्रू होऊ नका. घ्या वाटून एकमेकांचे सुखदुःख, रहा एकमेकांसोबत; रहा उभे एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन पण कधी सोबत राहून कोणाचा पाय खेचू बघू नका त्या पेक्षा वेगळे व्हा. आयुष्याच्या ह्या प्रवासात दोन शब्द गोडीचे आणि आपुलकीचे बोला, कटू वचनाने साध्य तरी काय होणार? आपल्या शब्दाने समोरच्याचे मनोबळ वाढवा, बघा तो व्यक्ती कायम सोबत राहील (पण तो कायम सोबत राहील ह्या आशेने काही करणार असाल तर ते निष्फळ ठरेल). आयुष्यात स्पर्धा परीक्षा महत्वाची पण तिथे पुढे जाताना स्वतःला मागे टाकू नका. एकदा स्वतः कडे नक्की वळून पहा. आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करा, पण जर नाही करता आले तर निराश होऊन न जाता अधिक योग्य प्रयत्न करा; आपल्याला अशी व्यक्तिमत्वे विज्ञान क्षेत्रात पाहायला मिळतात, अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टींवर न थकता परत परत प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांचे विचार सिद्ध करतात, यश मिळवतात. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगताना, दुसऱ्याला आपल्या मर्जीने वागवण्याचा हट्ट करू नका कारण त्याने काही साध्य होणार नाही पण जवळ असलेली माणसे मात्र दुरावतील.
विजय तेंडुलकरांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे' मध्ये लीना बेणारे म्हणतात "आयुष्य कुणासाठीच नसतं, ते स्वतःसाठीचं असतं, असलं पाहिजे, ते फार फार महत्वाचय, त्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण मोलाचाय!".आयुष्याच्या ह्या प्रवासात थोडे मोलाचे क्षण हे स्वतःसाठी राखून ठेवा. दुसऱ्यासाठी जगताना स्वतःसाठी जगायला विसरलात तर मग अर्थ तरी काय राहणार तुमच्या आयुष्याला? पण नक्कीच ते जगताना स्वच्छंद जगा. असे म्हणतात की आयुष्य असे जगा जसे की आजचा दिवस हा शेवटचा आहे.दुसऱ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करताना स्वतःच्या आशा अपेक्षांना विसरू नका. किती दिवस लेकरा-पोरांसाठी, आईबापासाठी, मित्रांसाठी जगायचे ते आपण स्वतः ठरवायला हवे. त्यांना पण हवे तसे आयुष्य जगू द्या. आजच्या ह्या धावपळीच्या युगात थोडे क्षण स्वतःसाठी जगायला शिका, नंतर परत म्हणू नका आयुष्य जगल्यासारखं वाटलं नाही; नंतर स्वतःला दु:खी करण्याची संधी देऊ नका.
आयुष्य हा एक सुंदर अनुभव आहे पण तो अनुभवता येणे महत्त्वाचे! आनंदाने, नव्या उमेदीने व हसून जगा आणि मग बघा किती सुंदर वाटतंय ते.
Awesome 😍😍😍
ReplyDeleteAmazing 😍🙌
ReplyDeleteFab 😃💕
ReplyDeleteसुरेख 😍
ReplyDelete🔥🔥🔥
ReplyDelete